मी अकरावी पासुन रुईया कॉलेजमध्ये शिकत होतो सुरुवातीला माझ्या ग्रुपमध्ये अनेक मित्र शैक्षणिक पाय-या ऒलांडु न शकल्यामुळॆ बारावी पर्यंत येऊन थांबले. एफ़.वाय.बी.ए. चा पहिल्याच दिवसापासुन एकट वाटायला लागल एरवी कट्ट्यावर कोणाची गरजच भासत नव्ह्ती, आपण आपला ग्रुप बस्स. आता आपल्याच कट्ट्यावर जाऊन बसायला विचित्र वाटत होत. सकाळी ८.३० ला येऊन कट्ट्यावर बसलो तिथुनच चहावाल्याला स्पेशल बनवायला सांगितली व दोन महिन्यापासुन पडलेला नित्यक्रम म्हणजे स्टेशनला उतरल्यावर रस्त्याच्या पलिकडे जाऊन सिगरेटच पाकिट घ्यायच आणि मग कॉलेजला जायच. एक दीड तास एकटा बसुन वैतागलो, पुन्हा चहा सांगुया म्हणुन उठलो तर आवाज आला " सन ये बॅग तुम्हारा है क्या ?" मी हो म्हणालो " थोडा उधर रखो ना, ये बैठने का जगा है, सामन रखने का नही" मी पट्कन माझी बॅग उचलली आणि ग्रिल ला लावली आणि चहाची वाट बघत बसलो. ही व्यक्ती म्हातरी आणि बोलायला उध्दट. माझी चहा आली मी सिगरेट पेटवली पण म्हटल धुराचा त्रास नको व्हायला म्हणुन तिथुन चहा उचलुन निघत होतो तर पुन्हा त्याच दरडावण्याच्या सुरातला आवाज "अरे बैठो मेरे को कोई प्रोब्लेम नही है" मी म्हटल "इट्स ओके अंकल, मै बैठ के पक गया हुं" मी त्यांच्या मागच्या कट्यावर जाउन बसलो. एवढ्यात रुईइया मधली एक मुलगी तिथे आली आणि त्या अंकलशी बोलत बसली. मी पण तिला निरखुन बघत होतो. दोघे ही मराठीत बोलत होते मराठी वरुन एवढ तर कळल की अंकल गेल्या सात जन्मातही मराठी म्हणुन जन्माला आले नव्ह्ते.
आता दररोजच झाल होत. बरोबर ९.३० वाजत ते त्यांची वॅगन आर बरोबर कट्ट्यासमोर लावायचे. तिथे दुस-या कोणीही गाडी लावयच नाही. गाडीतुन उतरताना पहिल्यांदा पॅसेंजर सीटवर ठेवलेली काठी बाहेर यायची नंतर अंकल! आता हळु हळु माझ आणि त्यांच बोलण व्हायच. ते दररोज न चुकता बरोबर ९.३० ला कट्ट्यावर य़ायचे, कधी पाउस जोरात असेल तर मात्र त्यांची दाडी व्हायची.
बोलण्या बोलण्यात कळल कि ते पारसी, त्यांच नाव फ़िरोज छापखानावाला, वय वर्ष ७१, बॅक ऑफ़ टोकीयो मधुन रिटायर, रहायला पारसी कॉलनी मध्ये त्यांच्या घरात त्यांची बायको एवढच. जसाजसा वेळ गेला आमची मैत्री दाट झाली होती. दररोज न चुकता ९.३० ला येणारे आणि वरोबर ११ वाजता बायकोचा फ़ोन आल्यावर जाणारे. मला हा माणुस फ़ार आवडायचा कारण तो नेहमी मला त्याच्या काळात घेऊन जायचा आणि त्यांच्या गोष्टी सांगताना तो दीड तास मी जुनी मंबई, ट्राम, त्यावेळेची अर्थ व्यवस्था आणि त्याकाळी मुंबईचे धुतले जाणरे रोड, आठ आण्यात पायधुनी पासुन दादर टीटी पर्यंतचा प्रवास, अंकलने त्यांच्या बायकोला कस पटवल या सर्व गोष्ट जगायचो. एकदा बोलताना कळल की त्यांना एक मुलगी आहे आणि तिने मराठी मुलाबरोबर लग्न केल. लग्नानंतर चार वर्षांनीच तिचा नवरा हार्ट अॅटॅकने वारला. त्याच्या पासुन तिला एक मुलगी आहे आणिती आता नववीला आहे. मुलगी मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. नातीबरोबर खेळायला जीव तुटत असतो पण मुलीने जाती बाहेर लग्न केल्याने तिला पारसी कॉलनी मध्ये कायमस्वरुपी खोली मिळत नाही. ति थोडी लांब राहते. आयुष्यातली सर्व कर्तव्य पार पाडुन रीटायर झाल्यावर बायकोला युरोप फ़िरवुन आलेला माणुस आता नाती ला डॉक्टर करण्यासाठी म्हणुन आपल्याला जमेल तेवढी बचत करुन बॅकेत पैसे साठवतोय.
आजारांची नाव सांगताना दम लागायचा एवढे आजार, पण तरीही कधी अंथरुणाला खिळुन नाही. आयुष्यात जे काही चुकल ते मला सांगतानासुध्दा कचरले नाहीत. मुलीबद्दल बोलताना नेहमी त्यांच मन भरुन यायच. तीन वर्ष होत आली होती. आता दोन महिन्यात माझी परिक्षा होती. हॉल तिकिट घेऊन कट्ट्यावर आलो पण आज अंकल नाही आले. घरी फ़ोन केल्यावर अंटी म्हणाली तब्येत खराब आहे बहुतेक उद्यापण येणार नाही. पण अंकल दुस-या दिवशी हजर त्यांचा आजार फ़ार बळावला होता त्यांना लघवी धरवत नव्हती अगदी १५ सेकंद सुद्धा नाही. माझा शेवट्च्या वर्षाचे पेपर झाले आणि माझ कॉलेजला जाण बंद झाल. जुन महिन्यात एकदा अंकलचा फ़ोन आला. " क्या पंक्या भुल गया क्या तु तेरे अंकलको?" सोमवारी आमच भेटण ठरल मी साडे सात वाजताच कॉलेजला पोहोचलो. ९ ला अंटीने फ़ोन करुन सांगितल "अंकल जब उधर आयेगा तो चलते समय उनका हाथ पकडना नही तो वो गिर जायेगा." अंकल आले मी डि.पी. मध्ये दोन स्पेशल चहा सांगितला आणि अंकल जवळ यॆउन बसलो. अंकलच्या चेह-यार भयंकर थकावट दिसत होती ते ११ वाजे पर्यंत नाही थांबले १०.१५लाच निघाले. मी नंतर एकदा तब्येतीची चौकशी करण्यासाठी फ़ोन केला तो तेवढाच त्यानंतर मी जॉब शॊधण्यात मग्न होतो. एक दिवस अंटीचा फ़ोन आला कि अंकल हॉस्पिट्ल मध्ये आहेत आणि तुला फ़ार विचारतात प्लिज एकदा भेटुन जा मी दुस-या दिवशी माझ्या मित्राला घेउन पारसी जनरल हॉस्पिटल मध्ये गेलो अंकल फ़ार खुश झाले त्यांच्यासाठी मी डी.पी.चा स्पेशल चहानेला होता पण डॉक्टरने त्यांना बाहेरच खाण्यासाठी मज्जाव केला होता. त्यांना तो चहा पिता आला नाही मी म्हणलो लवकर बरे व्हा मग कट्ट्यावर बसुन चहा पिउया. भेटण्याची वेळ संपली मी निरोप घेतला. अंकल बरे झाले आणि त्यांना घरी आणल्याच कळल. मी सुध्दा आता जॉबला होतो त्यामुळॆ रुईयाला जाण पुर्ण बंद झाल होत. डिसेंबर मध्ये फ़ोन आला की अंकल वारले इच्छा असुन सुध्दा त्यांच्या अंत्यविधिसाठी जाता आल नाही. डॊळ्यात पाणी आल. तीन वर्ष आम्ही त्या कट्ट्यावर बसलो आणि तीन वर्षानंतर आमचे मार्ग कायमचे वेगळॆ झाले. आजही कट्ट्यासमोरुन जाताना थांबतो तिथे पाहतो पण एकट बसायची इच्छा होत नाही, मग तसाच निघुन येतो....